
कासा फेस्टिव्हलला भव्य सुरुवात; ग्रामीण संस्कृतीचा जल्लोष
पालघर : प्रतिनिधी जनतेचा वाली
पालघर जिल्ह्यातील मध्यवर्ती व व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे असलेले कासा गाव ‘कासा फेस्टिव्हल’मुळे पुन्हा एकदा सांस्कृतिक जल्लोषात न्हाऊन निघण्यास सज्ज झाले आहे. आदिवासीबहुल ग्रामीण भागातील कला, परंपरा आणि खाद्यसंस्कृतीला व्यापक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला आजपासून (६ फेब्रुवारी) भव्य सुरुवात होत आहे.
कासा गाव हे सांस्कृतिक, राजकीय आणि शैक्षणिक वारशाने समृद्ध असून येथील आदिवासी चित्रशैली, पारंपरिक नृत्यप्रकार, खाद्यसंस्कृती तसेच धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांमुळे गावाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. या परंपरेचा प्रसार व्हावा आणि स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने गेल्या वर्षी प्रथमच कासा फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्याच वर्षी या महोत्सवाला तब्बल तीन लाखांहून अधिक नागरिकांनी उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
मागील वर्षाच्या यशानंतर यंदाचा फेस्टिव्हल अधिक भव्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून आयोजक आणि कासा पोलिस प्रशासनाने कार्यक्रमस्थळाची सखोल पाहणी केली आहे.
फेस्टिव्हलदरम्यान नागरिकांच्या सोयीसाठी वाहनतळाची स्वतंत्र व्यवस्था, स्वच्छता आणि सुरक्षेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. तसेच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, हस्तकला आणि स्थानिक उत्पादनांचे स्टॉल उभारण्यात आले असून या माध्यमातून स्थानिक व्यावसायिक, कलाकार तसेच महिला बचत गटांना आर्थिक संधी उपलब्ध होणार आहे.
हा महोत्सव ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडणार असून उद्घाटन समारंभ आज दुपारी ३ वाजता होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यासोबतच प्रसिद्ध गायक, लावणी कलाकार, दूरचित्रवाणी मालिकांतील कलाकार तसेच स्थानिक युट्युब कलाकारांचे मनोरंजनात्मक कार्यक्रमही प्रेक्षकांचे आकर्षण ठरणार आहेत.
कार्यक्रमाच्या अंतिम पाहणीवेळी कासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमर पाटील यांच्यासह आयोजक पांडुरंग बेलकर, हरेश मुकणे, जितू पटेल आणि विपुल राऊत उपस्थित होते. फेस्टिव्हल शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी प्रशासन आणि आयोजकांनी समन्वयाने नियोजन केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
दरम्यान, कासा फेस्टिव्हलमुळे आदिवासी संस्कृतीला चालना मिळण्यासोबतच कासा गावाची ओळख राज्यपातळीवर अधिक ठळक होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.