
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गणिताची गोडी; सूर्या व्हॅली स्कूलमध्ये गणितीय कार्यशाळा
पालघर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण करून त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने पालघर तालुक्यातील चहाडे (सज्जन पाडा) येथील सूर्या व्हॅली स्कूलमध्ये ‘बियॉन्ड द इन्फिनिटी’ ही एकदिवसीय गणितीय शैक्षणिक कार्यशाळा बुधवारी (११ फेब्रुवारी) उत्साहात पार पडली. गणित विभाग विज्ञान संस्था आणि डॉ. होमी भाभा राज्य स्टेट युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. गणित विषयाविषयी विद्यार्थ्यांमध्ये असलेली भीती दूर करून संकल्पनांची सुलभ आणि प्रात्यक्षिक स्वरूपात मांडणी करण्यावर कार्यशाळेत विशेष भर देण्यात आला. अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ही कार्यशाळा मार्गदर्शक ठरली.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांच्या सहभागातून तब्बल १६ गणितीय मॉडेल तयार करण्यात आली. या मॉडेलच्या माध्यमातून विविध गणितीय संकल्पना प्रत्यक्ष उदाहरणांच्या साहाय्याने समजावून सांगण्यात आल्या. संख्याशास्त्र, लॉजिकल बिल्डिंग, वस्तूंची घनता मोजण्याच्या पद्धती तसेच गणिताशी संबंधित विविध प्रयोगात्मक उपक्रमांचा कार्यशाळेत समावेश करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणित विषय अधिक रंजक आणि समजण्यास सोपा वाटल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक उपक्रम उपलब्ध करून देण्यासाठी अशा कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत शाळेच्या व्यवस्थापनाने व्यक्त केले. आधुनिक शैक्षणिक पद्धतींचा अवलंब करून विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती आणि तर्कशक्ती विकसित करण्यासाठी पुढील काळातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही शाळा प्रशासनाने स्पष्ट केले.