खानिवडेत कॅन्सर तपासणी; सत्पाळ्यात एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती



63 जणांची तपासणी, 4 संशयित रुग्ण; पालक सभेत लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित


पालघर, 20 मार्च : जनतेचा वाली
जिल्हा परिषद पालघर अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने विविध ठिकाणी आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येत असून खानिवडे येथे कॅन्सर तपासणी शिबिर तर सत्पाळा येथे एचपीव्ही (HPV) लसीकरणाबाबत पालक सभा पार पडली.


आयुष्मान आरोग्य मंदिर भाताणे अंतर्गत उपकेंद्र खानिवडे येथे 17 मार्च रोजी कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून एकूण 63 रुग्णांची तपासणी करण्यात आली. दंतरोगतज्ज्ञ डॉ. सागर नागरे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा मुळीक यांनी रुग्णांची सखोल तपासणी केली. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने 17 महिलांची VIA पद्धतीने तपासणी करण्यात आली असून त्यात 4 संशयित रुग्ण आढळले. संबंधित रुग्णांचा पुढील तपासणी व उपचारासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्र आगाशी अंतर्गत आरोग्य वर्धिनी केंद्र सत्पाळा कार्यक्षेत्रातील कार्मेल स्कूल, नांदाखळ येथे 20 मार्च रोजी एचपीव्ही लसीकरण मोहिमेबाबत पालक सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत पालक, मुख्याध्यापक व शिक्षकांना लसीकरणाचे महत्त्व, फायदे तसेच गैरसमज दूर करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य शिक्षणाद्वारे पालकांना लसीकरणाबाबत जागरूक करण्यात आले.
या प्रसंगी डॉ. दिपाली दीपके (प्रभारी वैद्यकीय अधिकारी, आगाशी), डॉ. सूर्यभान शेंडगे (समुदाय आरोग्य अधिकारी), संध्या पटेल (आरोग्य सेविका), रोहित संदुकवार (आरोग्य सेवक) तसेच आशा सेविका सुवर्णा कांबळे व वर्षा गोवारी उपस्थित होत्या.
या दोन्ही उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभल्याचे प्रशासनाने नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *