क्रीडा स्पर्धांमुळे आरोग्य, मनोबल व कार्यक्षमता वाढते — C.O मनोज रानडे

जिल्हा परिषद अधिकारी–कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा
पालघर, दि. ३१ — जनतेचा वाली
पालघर जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. जिल्हा परिषद मुख्यालय येथे या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धांचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास) व्यंकटराव हुंडेकर यांच्यासह सर्व विभागप्रमुख व गट विकास अधिकारी उपस्थित होते. युनियन बँक ऑफ इंडियाचे उप महाप्रबंधक मुकेश कुमार बब्बर व सहायक महाप्रबंधक सावन शिव यांनीही उपस्थिती लावली. स्पर्धांसाठी युनियन बँकेकडून व्हिडिओग्राफी व खेळाडू किटचे प्रायोजकत्व देण्यात आले आहे.
जिल्हा परिषद मुख्यालय व मोखाडा तालुक्यातील कबड्डी सामन्याने स्पर्धांचा शुभारंभ झाला. जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांतील अधिकारी व कर्मचारी या स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत. कबड्डी, खो-खो, क्रिकेट, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, धावणे, रिले, कॅरम, रांगोळी आदी विविध खेळांचा समावेश आहे. या स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत.


सोमवारी (दि. २) विजेत्या संघ व खेळाडूंना बक्षिसांचे वितरण होणार असून सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या ताणातून मुक्ती देणारा हा उपक्रम असून, अशा स्पर्धांमुळे आरोग्य, मनोबल व कार्यक्षमता वाढते, असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *