
प्रतिनिधी / पालघर
पालघर तालुक्यातील शिगाव येथील कृषी विभागामार्फत उभारण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या बंधाऱ्याचे काम अर्धवट व निकृष्ट दर्जाचे झाल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. पावसाळ्यापूर्वीच काम पूर्ण व्हायला हवे होते, मात्र ठेकेदाराच्या ढिलाईमुळे शेतकरी आजही सिंचनाच्या पाण्यापासून वंचित आहेत.
शाश्वत सिंचनासाठी कृषी विभागाने सुमारे १५ लाखांचा निधी मंजूर करून शिगाव नाल्यावर सिमेंट काँक्रीटचा बंधारा उभारण्याचे काम एप्रिल महिन्यात सुरू केले. मात्र ठेकेदाराने मुदतीत काम पूर्ण न केल्याने बंधाऱ्याचे बांधकाम अर्धवटच राहिले. वरच्या पात्रातील गाळ व माती काढण्याचे काम न करता, पावसाळ्यातील पाणी वाहून जाण्यासाठी डाव्या बाजूला अनावश्यक चर खोदल्याने बंधाऱ्याच्या आजूबाजूच्या जमिनीची धूप होऊन बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
बंधारा पूर्ण झाला असता तर परिसरातील ९० ते १०० शेतकऱ्यांना सिंचनाचा मोठा फायदा झाला असता. पावसाळ्यानंतरच्या हंगामात बागायती शेतीसाठी पाण्याची सोय झाली असती. मात्र बंधाराच्या अर्धवट कामामुळे शेतकऱ्यांचे नियोजन उधळले असून, अनेकांना कोरडवाहू शेतीवर समाधान मानावे लागत आहे.
कृषी विभागाकडून बंधाऱ्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढ, जमिनीची धूप रोखणे, पुर नियंत्रण आणि जनावरांसाठी पाण्याची उपलब्धता यांसारखे अनेक फायदे अपेक्षित होते. मात्र ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हे सर्व फायदे कागदावरच राहिले आहेत.
या प्रकरणी उप तालुका कृषी अधिकारी संजय वाघ यांनी सांगितले की,
> “शिगाव येथील बंधाऱ्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आले आहेत. त्याला अजून कामाचे बिल देण्यात आलेले नाही. अंदाजपत्रकानुसार दर्जेदार काम करून घेण्यात येईल.”
शेतकऱ्यांचा सवाल असा — “कृषी विभागाचे बंधारे शेवटी ठेकेदारांसाठी आहेत की शेतकऱ्यांच्या हितासाठी?”