कृषी बाजार समितीच्या विकासाला गती : पालकमंत्री गणेश नाईक यांचा शेतकरी-केंद्रित दृष्टिकोन

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन
शेतकरी-केंद्रित, पारदर्शक बाजारव्यवस्थेचा संकल्प – पालकमंत्री गणेश नाईक
पालघर, दि. २६ जानेवारी — शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीशी संबंधित सर्व घटकांना न्याय देणारी आधुनिक कृषी उत्पन्न बाजार समिती उभारून शेतकरी हितासाठी नियोजनबद्ध विकास साधला जाईल, असा ठाम विश्वास वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.
नंडोरे नाका येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या कार्यालयीन इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार स्नेहा दुबे-पंडित, नगराध्यक्ष उत्तम घरत, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, बाजार समितीचे सभापती राजेंद्र पुरुषोत्तम पाटील, उपनगराध्यक्ष राजेंद्र आत्माराम पाटील, उपसभापती उत्तम मधुकर पाटील,  नागेश पाटील ,सुरेश पाटील ,भूषण पावडे ,अनिल गावड जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी यांच्यासह शेतकरी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी बोलताना नाईक म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा न्यायालयीन प्रक्रियेनंतर कायदेशीररीत्या समितीच्या ताब्यात आली असून, आता या जागेवर शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हिताची, पारदर्शक आणि कार्यक्षम बाजारव्यवस्था उभारणे ही सामूहिक जबाबदारी आहे. गाळे, दुकाने तसेच शेतकरी-व्यापाऱ्यांसाठी आवश्यक सर्व सोयीसुविधा असलेली इमारत उभारण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले.
“मी जाती-भाषेपलीकडे जाऊन काम पाहतो. चेहरा नव्हे तर काम महत्त्वाचे,” असे स्पष्ट करत त्यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून कोणताही प्रश्न प्रलंबित राहू दिला जाणार नाही, असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक समाजाचा विकास हक्काने व आत्मविश्वासाने व्हावा, हीच शासनाची भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा, हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा मूळ उद्देश असून पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर, हरित विकास प्रकल्प आणि जिल्हा नियोजन व विकास आराखड्यामुळे येत्या काळात मोठा बदल घडून येईल. “एकही शेतकरी किंवा व्यापारी वंचित राहणार नाही,” असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.
भूमिपूजनाच्या निमित्ताने पालघरच्या कृषी बाजार व्यवस्थेला नवी दिशा मिळत असून, शेतकरी-केंद्रित विकासाचा हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *