एकजुटीचा विजय! नावझे गाव पर्यावरण संवर्धनात राज्यात नंबर वन

पालघर जिल्ह्याचा  नावलौकिक मिळवणारे गाव नावझे

नावझे गावाची पर्यावरणपूरक झेप; माझी वसुंधरा ५.० उपक्रमात राज्यात प्रथम क्रमांक
पालघर : प्रतिनिधी जनतेचा वाली; पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने आदर्श निर्माण करत नावझे गावाने मोठी कामगिरी नोंदवली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा ५.०’ या महत्त्वाकांक्षी पर्यावरणीय उपक्रमात नावझे गावाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत तब्बल एक कोटी रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे. या यशामुळे गावाने अभिमानास्पद इतिहास घडवला असून संपूर्ण परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
‘माझी वसुंधरा’ हा राज्य शासनाचा पर्यावरण संवर्धनावर आधारित उपक्रम असून हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यावर त्याचा भर आहे. या अभियानांतर्गत ग्रामपंचायत, नगरपालिका व महापालिका स्तरावर स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन, वृक्षारोपण, जैवविविधता जतन आणि ऊर्जा बचत अशा विविध घटकांवर गुणांकन केले जाते. पर्यावरणाचा समतोल राखत शाश्वत विकास साधण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येतो.
या स्पर्धेत नावझे ग्रामपंचायतीने नियोजनबद्ध पद्धतीने विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवले. गावात स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला असून कचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. यासोबत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, जलसंवर्धन प्रकल्प आणि पर्यावरण जनजागृती उपक्रम राबवण्यात आले. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गावाच्या विकासात मोलाचा वाटा उचलला.
या यशामागे ग्रामपंचायत नावझेचे सुयोग्य नियोजन, स्थानिक नेतृत्वाचे मार्गदर्शन आणि ग्रामस्थांची एकजूट व अथक मेहनत कारणीभूत ठरली आहे. सामूहिक प्रयत्न, प्रामाणिकता आणि दृढनिश्चय यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हे नावझे गावाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.
नावझे गावाच्या या यशामुळे इतर गावांसाठीही पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *