
आदिवासी भागातील माता-बाल मृत्यू रोखण्यासाठी गाभा समितीची बैठक
पालघर, दि. २१ फेब्रुवारी जनतेचा वाली : आदिवासी भागातील माता व बालमृत्यू दर कमी करण्यासाठी जिल्हास्तरीय गाभा समितीची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी जिल्हा परिषद पालघर येथे पार पडली. बैठकीस डॉ. इंदुराणी जाखड अध्यक्षस्थानी होत्या.
बैठकीत माता व बाल आरोग्यविषयक उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. उच्चजोखमीच्या गर्भवतींचे वेळेवर निदान, संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढविणे, नवजात बालकांसाठी विशेष नवजात अतिदक्षता विभाग (SNCU) मजबूत करणे तसेच कुटुंब कल्याण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी यावर भर देण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सन २०२४-२५ या वर्षात माता-बाल संगोपन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. पालघर जिल्ह्यातील SNCU विभाग राज्यात उल्लेखनीय कामगिरी करत असून, जव्हार येथील केंद्राने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावल्याची माहिती देण्यात आली.
तसेच डहाणू तालुक्यातील सायवन प्राथमिक आरोग्य केंद्राने राज्यात सर्वाधिक प्रसूती करून प्रथम क्रमांक मिळविला. कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीतही पालघर जिल्ह्याने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविल्याचा उल्लेख करण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत आदिवासी भागात अधिक गुणवत्तापूर्ण व संवेदनशील सेवा देण्याच्या सूचना केल्या. माता व बालमृत्यू दर शून्याकडे नेण्याचे उद्दिष्ट ठेवून समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
