
मनोर येथे रामनवमी निमित्त सामुदायिक विवाह सोहळा; ग्रामीण भागात साधेपणाच्या विवाह पद्धतीला प्रोत्साहन
मनोर : जनतेचा वाली
पालघर जिल्ह्यातील मनोर येथे येत्या २६ मार्च रोजी रामनवमी उत्सवानिमित्त बिरसायत (महाराष्ट्र) संस्थेच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या उपक्रमाच्या तयारीचा भाग म्हणून १४ मार्च रोजी वधू-वर व त्यांच्या पालकांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीदरम्यान विवाहासाठी आवश्यक असलेले पूर्वतयारीचे साहित्य लाभार्थी जोडप्यांना वितरित करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी बिरसायत परिवारातील महिला व पुरुष कार्यकर्ते उत्साहाने तयारी करत आहेत.
ग्रामीण व आदिवासी भागात अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती मर्यादित असल्यामुळे पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पाडणे कठीण ठरते. अशा परिस्थितीत सामुदायिक विवाह सोहळ्यांमुळे अनेक तरुण-तरुणींना विवाहाचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होते. दुसरीकडे, प्रतिष्ठा दाखवण्याच्या स्पर्धेमुळे काही कुटुंबांवर विवाहासाठी मोठा आर्थिक बोजा पडून कर्जबाजारी होण्याची वेळ येते.
या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात साधेपणाने व सामाजिक सहभागातून विवाह करण्याची संकल्पना अधिक व्यापक करण्यासाठी सामुदायिक विवाह पद्धतीबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी सांगितले. भविष्यात गरीब-श्रीमंत सर्व घटकांनी या पद्धतीत सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन बिरसायत (महाराष्ट्र) संस्थेचे संस्थापक संतोष आनंदी शिवराम जनाठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
