
पालघर : प्रतिनिधी जनतेचा वाली
जिल्ह्यात वाढत्या अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी पालघर पोलिसांनी धडक कारवाई करत कासा पोलीस ठाणे हद्दीत मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे २१ लाख ५२ हजार रुपयांहून अधिक किमतीचा अफुजन्य अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.
पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलीस यंत्रणेला दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व कासा पोलीस ठाण्याचे पथक पेट्रोलिंग करत असताना सोमटा परिसरात अंमली पदार्थ साठवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमटा गावात छापा टाकला.
छाप्यादरम्यान एका घराशेजारील खोलीत सुकलेली अफूची बोंडे व त्यापासून तयार करण्यात आलेली डोडा पावडर असा एकूण १४३.५१ किलो अंमली पदार्थ साठवून ठेवलेला आढळून आला. पोलिसांनी तत्काळ हा साठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची बाजारभावानुसार किंमत २१ लाख ५२ हजार ६७५ रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केलेल्या संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अमर पाटील करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व कासा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले असून अवैध धंद्यांविरोधातील मोहीम पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. समिर मेहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, पोनि/अमर पाटील, प्रभारी अधिकारी, कासा पोलीस ठाणे, पोउपनि/पोउपनि/गोरखनाथ राठोड, बेपोउपनि /सुनिल नलावडे, पोहवा/४८६ संदिप सुर्यवंशी, पोहवा/५३० दिपक राऊत, पोअं/२०५ वैभव जामदार सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर तसेच परि. पोउपनि/मंदार मारकवाड, पोहवा /७४७ संतोष घनदाट, पोहवा/७०५ संतोष जाधव, पोहवा /१०३१ राजु भोये, पोना/२२ वैभव सातपुते, पोअं/११८८ सागर हमारे, पोर्भ/९४४ योगेश गांगुर्डे, पोअं/५४४ संतोष भोये सर्व नेमणुक कासा पोलीस ठाणे यांनी केली आहे.