सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या खासदाराच्या पाठपुराव्यामुळे पालघरकरांचा रेल्वे प्रवास अधिक सुलभ होणार .

वांद्रे–उधना विशेष रेल्वे आता दररोज; पालघरकरांना दिलासा
पालघर | प्रतिनिधी जनतेचा वाली
वांद्रे–उधना विशेष रेल्वे सेवा आता दररोज धावणार असल्याने पालघर लोकसभा मतदारसंघातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येत ०९०५५–५६ वांद्रे–उधना विशेष रेल्वे प्रत्यक्षात दैनिक स्वरूपात सुरू झाली आहे.
यापूर्वी ही रेल्वे आठवड्यातून केवळ पाच दिवस धावत होती. गुरुवार व शुक्रवार या दोन दिवस सेवा नसल्याने बोर्डी रोड, घोलवड, डहाणू रोड, वाणगाव, केळवे रोड, उमरोली, सफाळे व वैतरणा येथील कर्मचारी, कामगार, व्यापारी, विद्यार्थी तसेच दैनंदिन प्रवासी यांची मोठी गैरसोय होत होती. सुरक्षितता व वेळेच्या दृष्टीनेही प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
ही बाब लक्षात घेऊन खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी १३ जानेवारी २०२५ पासून रेल्वे प्रशासन तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. संसदेतही हा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात आला. २१ जानेवारी २०२६ रोजी मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडेही प्रश्न ठोसपणे उपस्थित करण्यात आला होता.
या प्रयत्नांना अखेर यश येत गुरुवार व शुक्रवारसाठी नवीन विशेष रेल्वे गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ०९०३५ वांद्रे–उधना (शुक्रवार, शनिवार) व ०९०३६ उधना–वांद्रे (गुरुवार, शुक्रवार) या गाड्या सुरू झाल्याने वांद्रे–उधना मार्गावरील सेवा दररोज उपलब्ध झाली आहे.
या निर्णयामुळे विरार ते वलसाड दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून प्रवासी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. याचबरोबर, सुट्टी विशेष तसेच नव्याने सुरू होणाऱ्या रेल्वे गाड्यांना पालघर जिल्ह्यातील स्थानकांवर थांबे मिळावेत, या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत वांद्रे–भिवाणी सुट्टी विशेष रेल्वेला पालघर स्थानकात थांबा मंजूर करण्यात आला आहे.
डहाणू उपनगरीय रेल्वे सेवा अधिक सक्षम व विस्तारित करण्यासाठीही खासदार डॉ. हेमंत सवरा यांचे प्रयत्न सुरू असून, सर्वसामान्य जनतेच्या सोयीसाठी पुढेही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या खासदाराच्या पाठपुराव्यामुळे पालघरकरांचा प्रवास अधिक सुलभ झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *