
नाना–नानी पार्क व ओपन जिम साहित्य खरेदीत गडबड?
नागझरी–चरी खुर्द ग्रामपंचायतीतील एक लाख रुपयांच्या पेमेंटवर प्रश्नचिन्ह
प्रतिनिधी, 20/11/2025 पालघर तालुक्यतील
नागझरी–चरी खुर्द ग्रुप ग्रामपंचायतमध्ये नाना–नानी पार्क आणि ओपन जिमखान्यासाठी करण्यात आलेल्या साहित्य खरेदीबाबत गंभीर अनियमितता उघडकीस आली असून ग्रामपंचायतीने डिसेंबर 2024 मध्ये ठेकेदाराला करण्यात आलेले एक लाख रुपयांचे ऑनलाईन पेमेंट आजअखेर वादाच्या भोवर्यात सापडले आहे. साहित्य खरेदीसाठी पैसे दिले असूनही हे साहित्य जवळपास वर्षभर उलटूनही गावात पोहोचलेले नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार, ग्रामपंचायतीच्या नोंदवहीत जिम साहित्याच्या खरेदीसाठी केलेले पेमेंट ‘अंगणवाडी शाळा – रंगरंगोटी’ या वेगळ्या शीर्षकाखाली नोंदवण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे या खरेदी प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे की, जिमखान्याचे साहित्य खरेदीसाठी निधी खर्च झाला, परंतु नाना–नानी पार्क आणि ओपन जिम आजही रिकामा आणि निष्प्रभ अवस्थेत आहे.
१५ वा वित्त आयोग निधी लक्षात घेऊन नाना–नानी पार्क तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मुक्त जागेत जिम साहित्य बसविण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या मार्फत ठेकेदाराला पेमेंटही करण्यात आले. मात्र साहित्य न आल्याने—
करार करण्यात आला होता का?
साहित्य किती दिवसांत देणे अपेक्षित होते?
याबाबत ग्रामपंचायतीने कोणता पाठपुरावा केला?
असे अनेक प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत.
याच ठेकेदाराला ग्रामपंचायत मार्फत जवळपास दहा लाखाचे धनादेश ( चेक) देण्यात आले होते मात्र बँकेचा धनादेश टाकू नका ते धनादेश परत द्या आम्ही तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करतो असे ग्रामपंचायत ग्रामसेवकाने सांगितल्यानंतर हे धनादेश ठेकेदाराने परत केले असल्याचे ठेकेदार भोजराज यांनी सांगितले, तर ग्रामपंचायत साठी साहित्य बाबतच्या पेमेंटसाठी वर्षभर पाठपुरावा करत असल्याचे सांगितले,
याबाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली असून ग्रामपंचायतीतील कामकाजावरील शंका अधिक गडद झाल्या आहेत.
दरम्यान, संबंधित ग्रामसेवक आणि सरपंचांकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. साहित्य गायब, नोंद वेगळी आणि पेमेंट वेगळ्या प्रकारे नोंदवले गेल्याने ही खरेदी प्रक्रिया आता तपासाच्या विळख्यात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
Thanks & Best Regards
JANTECHA WALI
Chief Editor – Vijay M. Gharat
Mob. : +91 9764820588